नागपूर - सैन्यदलात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या गिट्टीखदानमधील घरात सात ते आठ बुरखाधारी दरोडेखोरांनी पहाटेच्या वेळी प्रवेश केला. अधिकाऱ्याच्या वृद्ध आईचे हात बांधून त्यांना बंधक बनविल्यानंतर घरातील रोख तसेच सोन्याचांदीचे दागिने लुटून नेले. शुक्रवारी पहाटे घडलेल्या दरोड्याच्या या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
अनिता प्रभाकर मेश्राम (वय ७२) या दाभा येथील वेलकम सोसायटीत राहतात. त्यांचा मुलगा सैन्यदलात रायबरेली (उत्तरप्रदेश) येथे सेवारत आहे. घराच्या बाजुला अनिता यांची मुलगी तिच्या कुटुंबीयांसह राहते. तीच आईच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवते. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्रीचे जेवण दिल्यानंतर मुलगी निघून गेली. अनिता यांनी दार लावून घेतले आणि झोपल्या. शुक्रवारी पहाटे २.३० च्या सुमारास सात ते आठ आरोपी दाराचा कडीकोंडा तोडून आत शिरले. आवाज ऐकून जाग्या झालेल्या अनिता यांना विळा, पेचकसचा धाक दाखवून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांचे त्यांच्याच साडीने हात बांधून त्यांना बंधक बनवित आरोपींनी अनिता यांच्या गळ्यातील, कानातील तसेच हातातील सोन्याचे दागिने काढून घेतले. ओरडल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी दिल्याने वृद्ध अनिता यांचे अवसान गळाले होते. त्यामुळे दरोडेखोरांना ईजा न पोहचवण्याची याचना करत त्या गप्पच पडून राहिल्या. दरोेडेखोरांनी अवघे घर अस्तव्यस्त करून ११ हजार रुपये रोख आणि कपाटातील सोन्याचांदीचे दागिने घेऊन पळ काढला. सुमारे अर्धा तास गप्प राहिल्यानंतर वृद्ध अनिता यांनी स्वताच स्वताची सोडवणूक करून बाजूला राहणाऱ्या मुलीचे घर गाठले. मुलीला आणि नंतर शेजाऱ्यांना जागे करून या घटनेची माहिती देण्यात आली. नियंत्रण कक्षातही कळविण्यात आले. त्यानंतर पोलीस उपायुक्त विनीता साहू, ठाणेदार गजानन कल्याणकर आपापल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. सैन्य दलात कार्यरत अधिकाऱ्याच्या घरी दरोडा पडल्याचे कळताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली. अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
श्वान घुटमळले अन् माघारी फिरलेघटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोलिसांनी दरोडेखोरांचा छडा लावण्यासाठी शहरातील सीमांवर नाकेबंदी केली. ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथक बोलवून घेतले. श्वान बाजुच्या मैदानापर्यंत जाऊन घुटमळल्यानंतर माघारी फिरले. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. वेगवेगळ्या भागात पोलीस पथके दरोडेखोरांचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र, रात्रीपर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागले नव्हते.
चड्डी बनियन टोळीचे कृत्य
दरोडेखोरांकडे विळा, पेचकस, लोखंडी रॉड अन् गुल्लेर होता. ते आपसात हिंदीत बोलत होते. सर्वांनी नाकातोंडावर स्कार्फ बांधला होता. बहुतांश जण बरमुड्यावर होते. या सर्व बाबींमुळे दरोडेखोर प्ररप्रांतिय असावे आणि ते अण्णा टोळी किंवा चड्डी बनियन टोळीचे सदस्य असावे, असा अंदाज आहे.