४७ लाखांच्या जुन्या नोटा जप्त; मांत्रिकाकडे होता चिराग, जादुने करणार होता नवीन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 10:14 AM2023-10-25T10:14:31+5:302023-10-25T10:24:19+5:30
मुरैना येथील रहिवाशी असलेल्या सुल्तान करोसिया यांनी ४७ लाख रुपयांच्या जुन्या नोटांचे नवीन नोटांमध्ये रुपांतर करण्यासाठी मांत्रिकाकडे धाव घेतली.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्यात आला, हा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. मात्र, आजही महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत मांत्रिक, तांत्रिक, भोंदूबाबांवर विश्वास ठेऊन माणसं नको ते उद्योग करतात. त्यातून गुन्हेगारीला बळी पडतात. मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे पुन्हा एकदा मांत्रिकाच्या जादुगिरीला भुलून एका व्यक्तीची फसवणूक झाल्याचे समोर आले. पोलिसांनी या व्यक्तीकडून ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत, ज्याची किंमत ४७ लाख रुपये एवढी आहे.
मुरैना येथील रहिवाशी असलेल्या सुल्तान करोसिया यांनी ४७ लाख रुपयांच्या जुन्या नोटांचे नवीन नोटांमध्ये रुपांतर करण्यासाठी मांत्रिकाकडे धाव घेतली. आरोपी सुल्तानला नोटबंदी काळात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात या नोटा सापडल्या होत्या. तेव्हापासून त्याने ह्या नोटा लपवून ठेवल्या होत्या.
एका मांत्रिकाने जुन्या नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देण्याचं आमिष दाखवलं. या तांत्रिकाकडे एक जिन्न असून तो पाहिजे ते करून देतो. मनातील सर्व इच्छा पूर्ण करतो, अशी माहिती मांत्रिकाने सुल्तानला दिली होती. त्यामुळे, तो मांत्रिकाच्या भेटीसाठी नोटांचे बंडल घेऊन जंगलाकडे निघाला होता. मात्र, पोलिसांनी आरोपी सुल्तानला पकडले. पोलिसांना मिळालेल्या टीपच्या आधारे मोटारसायकलवरुन जाणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी पकडले. त्यावेळी, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करुन त्यास पकडले. पोलिसांनी पकडले असता आरोपीच्या बॅगमध्ये ४७ लाख रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या.
दरम्यान, पोलीस अधीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपी हा नोटांसंदर्भात स्पष्टीकरण देताना योग्य माहिती देत नव्हता. संशयास्पद माहिती देत असल्याने याबाबत आयकर विभागालाही कळवण्यात आले आहे.