पिंपरी : वृद्ध आई-वडिलांनी घर खाली करावे, तसेच घराचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी मुलाने व त्याच्या पत्नीने त्यांना मारहाण केली. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनी स्थापन करून कोऱ्या स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने आई-वडिलांच्या सह्या घेतल्या. पिंपळे गुरव येथे २००६ ते १ फेब्रुवारी २०२० या कालावधीत हा प्रकार घडला.जी. वर्गीस केजी जॉर्ज (वय ७०, रा. ग्रेस व्हिला, गांगार्डे नगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मुलगा जॉर्ज वर्गीस, सून जेनी जॉय, कंपनीतील कामगार महिला लीना व्होरा, स्मिता सावरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेवानिवृत्त आहेत. त्यांचे राहते घर खाली करण्यासाठी तसेच घराचा ताबा घेण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना व त्यांची पत्नी यांना धमकी देऊन मारहाण केली. फिर्यादी यांच्या घराच्या नावाचा पत्ता बनवून बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी एक कंपनी स्थापन केली. कोऱ्या स्टॅम्प पेपरवर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या जबरदस्तीने सह्या घेतल्या. फिर्यादी यांच्या घरातील पैसे आणि दागिने स्वत:चे आहेत, असे समजून आरोपी घेऊन गेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
संतापजनक! घर खाली करण्यासाठी वृद्ध आई-वडिलांना मारहाण; पिंपळे गुरव येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 6:37 PM
कोऱ्या स्टॅम्प पेपरवर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या जबरदस्तीने घेतल्या सह्या
ठळक मुद्दे मुलगा व सुनेसह चौघाजणांवर गुन्हा दाखल