नवी दिल्ली : मोटारसायकल, स्कूटरवरून 42 हजार किलो तांदूळ चोरी करण्यात आले? हे कोणाला सांगून खरे वाटेल का? नाही ना...पण भारतीय खाद्य निगम (एफसीआई) च्या अधिकाऱ्यांनी हा प्रताप करून दाखविला आहे. आसाममध्ये काही अधिकाऱ्यांवर खासगी ट्रान्सपोर्टशी हातमिळविणी करत तब्बल 2.60 लाख किलोंचा तांदूळ चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी तांदूळ ट्रकातून नेण्यात आल्याचे जरी म्हटले असले तरीही रजिस्टरमध्ये स्कूटर आणि बाईकचे नंबर दिले आहेत.
आसामच्या सालचापरा रेल्वे टर्मिनलमधून 9119 क्विंटल (9.19 लाख किलो) तांदूळ 57 ट्रकांमधून मणिपूरच्या कोईरेंगेईला पाठविण्यात आला होता. 7 ते 22 मार्च, 2016 या काळात रवाना झालेल्या या तांदळाच्या ट्रकांना 275.5 किमीचे अंतर कापण्यासाठी दोन महिने लागले. खासगी ट्रान्सपोर्ट झेनिथ एंटरप्रायझेसच्या ट्रकांना तांदूळ वाहतुकीचा परवाना देण्यात आला होता. एफसीआयच्या तक्रारीनंतर सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास केला आहे.
तपासामध्ये अशी माहिती समोर आली की, 16 ट्रकमधून 85 लाख रुपयांचा 2601.63 क्विंटल तांदूळ सालचापरा येथून बाहेर पडला खरा पण अपेक्षित ठिकाणी पोहोचलाच नाही. मात्र, रजिस्टरमध्ये हा तांदूळ कोईरेंगेईला पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे. ट्रान्सपोर्टरने दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, रस्त्यात ट्रक बिघडल्याने दुसऱ्या ट्रकांमधून हा तांदूळ पोहोचविण्यात आला. मात्र, चौकशीमध्ये असे आढळले की, या बिघडलेल्या ट्रकांमधून तांदळाची पोती ज्या वाहनांमध्ये भरण्यात आली ती वाहने ट्रक नव्हतीच.
या वाहनांच्या क्रमांकावर आरटीओकडे एलएमएल स्कूटर, होंडा अॅक्टिव्हा, बाईक, बस, पाण्याचे टँकर, व्हॅन, कार सह अन्य प्रकारच्या वाहनांची नोंद आहे. तर काही नंबर असे दिलेले आहेत, की हे नंबरच आरटीओकडे रजिस्टर नाहीत. चोरी झालेल्या तांदळांपैकी 26,300 किलो स्कूटर आणि 16,300 किलो बाइकवरून नेण्यात आल्याची नोंद आहे.