कुपटा (जि. परभणी) : हट्टा येथे महाप्रसादासाठी गेलेल्या तीन बालकांना परत येताना सेलू तालुक्यातील कुपटा शिवारातील शेताजवळ समोर साप दिसला. सापाच्या भीतीने हे तीनही बालक तेथून पळाले असता, एक आठ वर्षीय बालक कठडा नसलेल्या सपाट विहिरीत पाय घसरून पडला. ही घटना रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. अन्य दोघे जण मात्र दुसऱ्या दिशेने गेल्याने ते सुखरूप वाचले. दरम्यान, त्या विहिरीत पडलेल्या बालकाचा रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू होता.
याविषयी माहिती अशी, रोशन प्रल्हाद शिंदे (८) आणि त्याचा मोठा भाऊ सुरज शिंदे (११), छोटू सूर्यवंशी (८) हे तिघे कुपटापासून तीन किमी अंतरावरील हट्टा येथे महाप्रसादासाठी रविवारी दुपारी गेले होते. जेवण करून परतताना कुपटा शिवारातील रस्त्यालगत मारोती शिंदे यांच्या शेताजवळ ते आले असता, तिघांना साप दिसला. सापाच्या भीतीने ते तिघे पळाले. यावेळी दोघे जण हे वेगळ्या दिशेने गेले तर रोशन हा कठडा नसलेल्या सपाट विहिरीच्या दिशेने जात असताना त्याचा पाय निसटून तो विहिरीत पडला. त्यानंतर भाऊ सुरज शिंदे, छोटू सूर्यवंशी यांनी आरडाओरडा केला.
बाजूला शेतात कामाला असलेल्या महिला, शेतकरी तेथे जमले. ही माहिती मुलांच्या घरच्यांना दिल्यावर त्याचे आजोबा साहेबराव हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलाला वाचवा, बाहेर काढा, असा हंबरडा फोडला. त्यावेळी पवन शिंदे, संघर्ष साळवे यांच्यासह काही तरुणांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र, अथक परिश्रम करूनही शोध लागला नाही. या घटनेची माहिती बोरी पोलिस ठाण्याला कळवली. यानंतर बोरीच्या पोलिस उपनिरीक्षक नीता कदम, एस. आर. कोकाटे, एस. एन. सावंत, प्रधान, लगड हे घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांतर्फे अनिरुद्ध सोळंके यांच्या विद्युत पंपाच्या सहाय्याने मोटार लावून सायंकाळी ६:४५ पासून शोधकार्य सुरू झाले. गावातील नीलेश सोळंके, उपसरपंच राजू सोळंके, सतीश चौधरी, सतीश सोळंके, शाहरुख शेख, संजय साळवे, दिगंबर सरोदे यांच्यासह गावकरी प्रयत्न करत आहेत. रात्री ८:३० वाजेपर्यंत शोधकार्य सुरूच होते. मात्र, बालकाचा शोध लागला नव्हता.
आजी-आजोबांकडेच शिक्षण
रोशन, सुरज व त्यांच्या दोन बहिणी या लहानपणापासून त्यांच्या आजी-आजोबांकडे राहतात. त्यांचे आई-वडील हे नाशिकला कामासाठी अनेक वर्षांपासून आहेत. हे सर्व मुले आजी-आजोबांकडे शिक्षण घेण्यासाठी राहतात.