लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी क्षुल्लक कारणातून भावाने बहिणीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील जानकर काॅलनीमध्ये घडली. याप्रकरणी भावावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन शिवाजी खरात (रा. जानकर काॅलनी, मंगळवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या भावाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुजा नवनाथ जरग (वय २३, रा. जानकर काॅलनी, मंगळवार पेठ, सातारा) ही विवाहित असून, तिचा भाऊ नितीन खरात हा त्याच काॅलनीत राहतो. लक्ष्मीपूजनदिवशी सायंकाळी नितीनने बहिणीला मोटार सायकल मागितली. परंतु बहीण पूजा हिने मोटारसायकल देण्यास नकार दिला. यामुळे चिडून जाऊन नितीनने लाकडी दांडक्याने बहिणीच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. तसेच यावेळी त्याने बहिणीला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्याने लक्ष्मीपूजनासाठी घराबाहेर उभ्या केलेल्या दोन दुचाकीचीही लाकडी दांडक्याने तोडफोड करून नुकसान केले. या प्रकारानंतर बहिणीने भावाच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी नितीन खरातवर गुन्हा दाखल केला.