शिरपूर : भविष्य निर्वाह निधीतून ना परतावा अग्रीम मंजूर करण्यासाठी ५ हजारांची मागणी गटविकास अधिकारी युवराज शिंदे यांना भोवली. सहायक लेखा अधिकारी चुनीलाल देवरे यांच्या हस्ते रक्कम स्वीकारताना शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी दुपारी झाली.शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील प्राथमिक शिक्षक यांनी घराच्या दुरुस्तीकामी भविष्य निर्वाह निधीतील ५ लाख रुपये न परतावा अग्रीम मिळण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या नावे अर्ज केला होता. ही रक्कम मंजूर करण्यासाठी ५ हजारांची लाच मागण्यात आली हाेती.
ही लाच घेताना गुरुवारी या दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे गटविकास अधिकारी युवराज शिंदे हे गुरुवारी सेवानिवृत्त होणार हाेते. त्यांचा शुक्रवारी पंचायत समिती कर्मचाऱ्यांतर्फे सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ होणार होता. त्याची पत्रिका सोशल मीडियावर टाकण्यात आलेली होती. मात्र, सेवानिवृत्तीच्या दिवशीच लाचखोरीच्या गुन्ह्यात शिंदे यांना पकडण्यात आले.