खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खवटी येथे १ किलो ८०८ ग्रॅम गांजा खेड पोलिसांनी जप्त करून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी (२८) रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असून, रवींद्र सहदेव जाधव (वय ४५, रा. सिद्धार्थनगर, मुक्ताबाई हॉस्पिटल, भटवाडी, घाटकोपर वेस्ट, मुंबई) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
खेड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री एका इको गाडीतून गांजा विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याचे समजले होते. या माहितीआधारे पोलिस निरीक्षक नितीन भोयर, हवालदार कोरे, शिपाई कडू, वैभव ओहोळ व कृष्णा बांगर यांच्या पथकाने महामार्गावर तुळशी फाटा येथे पाळत ठेवली होती. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास (एमएच ०८ एएन ७१५८) या क्रमांकाची इको मुंबईच्या दिशेने जात असल्याचे दिसले.
या भरधाव वेगाने जात असलेली व्हॅन पोलिस पथकाने पाठलाग करून थांबवली. झडती घेतली असता गाडीमध्ये २७,०७२ रुपये किमतीचा एका प्लास्टिक पिशवीमध्ये असलेला हिरवट पाने, फुले, काड्या व बिया असलेला उग्र वास असलेला एकूण १ किलो ८०८ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा सापडला. याप्रकरणी पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीची गाडी, १२ हजार रुपये किमतीचे ३ मोबाइल फोन व ५०९० रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ४४ हजार २१२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू केला आहे.
कारवाईला महत्त्वचिपळूणमध्ये फोफावलेल्या अमली पदार्थ विक्रीबाबत ओरड होत असताना पोलिसांनी केलेल्या या कारवाईला महत्त्व आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा केली जात आहे.