लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून चोरी, तसेच गहाळ झालेले २१ तक्रारदारांचे दोन लाख १२ हजारांचे २१ मोबाइल त्यांना परत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी सोमवारी दिली. गहाळ झालेले मोबाइल पुन्हा दिवाळीच्या मुहूर्तावर सुखरूप मिळाल्याने या सर्व तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या दहा महिन्यांच्या काळात कापूरबावडी भागातून बस प्रवासात तसेच इतर ठिकाणी सुमारे २१ जणांचे मोबाइल वेगवेगळ्या ठिकाणांहून गहाळ झाले होते. यातील बरेच मोबाइल हे विक्री झाल्याचे आढळले. जुने आणि गहाळ झालेले मोबाइल हे उत्तर प्रदेश, बिहार किंवा इतर राज्यांत चालू झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणातून उघड झाली. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर आणि पोलीस हवालदार शेजवळ यांच्या पथकाने या मोबाइलचा शोध घेतला.
ज्या गावात किंवा राज्यांत हे मोबाइल आहेत, तसेच ज्याच्या ताब्यात ते आहेत, त्यांचा ठावठिकाणा काढण्यात आला. त्यांना विश्वासात घेऊन ते परत करण्याचे आवाहन केले. ज्यांच्याकडे ते मोबाइल होते, त्यांनी ते कोणाकडून तरी खरेदी केले होते. त्यांना हे मोबाइल परत करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. त्याला प्रतिसाद देत अनेक लोकांनी बाहेरगावावरून कुरिअरद्वारे कापूरबावडी पोलिसांना ते मोबाइल पाठविले. हे मोबाइल मिळाल्यानंतर संबंधितांकडून त्याची ओळख पटवून त्यांना ते परत केल्याने या फियार्दींनी पोलिसांचे आभार मानले आहेत.