पटना - आपल्या देशात किडनी चोरीच्या बातम्या अनेकदा चर्चेत असतात. उपचाराच्या नावाखाली फसवणूक करून रुग्णांची किडनी चोरणे अशा घटनांनी अनेकांना धक्का दिलाय. राजधानी दिल्लीपासून अनेक छोट्या शहरात किडनी चोर रॅकेट पकडले आहेत. परंतु बिहारच्या मुझफ्फरपूर इथं किडनी चोरीचं असं प्रकरण समोर आलंय जे ऐकून सर्वच हैराण झाले आहेत.
याठिकाणी एका डॉक्टरनं उपचाराच्या नावाखाली एका महिलेची एक नव्हे तर दोन्हीही किडनी काढून घेतली आणि मृत्यूच्या दारात ढकललं आहे. किडनीशिवाय माणूस २-३ दिवसापेक्षा जास्त जगू शकत नाही. सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेली ३ मुलांची आई सुनीता देवी सध्या देवदूताच्या शोधात आहे. जो तिला शोधत हॉस्पिटलला येईल आणि एक किडनी दान करेल. सुनीता देवीला जिवंत राहण्यासाठी एका किडनीची गरज आहे. नाहीतर प्रत्येक क्षणाला ती मृत्यूकडे ओढली जाईल. येणारा कोणता दिवस, कोणती वेळ आणि कुठला क्षण तिच्या आयुष्याचा अखेरचा ठरेल हे कुणीही सांगू शकत नाही.
सुनीताच्या शरीरात एकही किडनी नाहीसुनीताची ही अवस्था तिच्या शरीरातील एकही किडनी नसल्याने झाली आहे. किडनी मानवी शरीरात २ असतात. कुठल्या आजाराने किंवा अन्य कारणाने खराब झाली तर तो एका किडनीच्या सहाय्याने जगू शकतो. परंतु कुणाच्या शरीरात एकही किडनी नसेल तर? तो व्यक्ती जिवंत कसा राहू शकतो असा प्रश्न उभा होतो.
यूटरस इन्फेक्शनच्या तक्रारीमुळे घरच्यांनी सुनीताला शहरातील बरियारपूर चौकातील शुभकांत नावाच्या प्रायव्हेट नर्सिंगमध्ये दाखल केले. सुनीताची तब्येत जास्त खराब झाली होती. डॉक्टर पवन कुमार यांनी ऑपरेशन करण्यास सांगितले. घरचेही राजी झाले. मात्र ऑपरेशनच्या बहाण्याने सुनीताची एक नव्हे तर दोन्हीही किडनी काढण्यात आली. शरीरातील किडनी काढून घेतल्यानं सुनीताची तब्येत आणखी बिघडली. तेव्हा घरातले चिंताग्रस्त झाले. या ऑपरेशननंतर डॉ. पवन कुमार यांनी सुनीताला रुग्णवाहिकेने पटनाला उपचारासाठी पाठवले. त्याठिकाणी तिची तपासणी करण्यात आली. तेव्हा सुनीताच्या दोन्ही किडनी काढलण्याचा प्रकार उघडकीस आला.
सुनीताच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी डॉक्टर फरार झाला. परंतु पोलिसांनी त्याला शोधून जेलमध्ये पाठवले. परंतु सुनीताच्या आयुष्यात कायमच संकट आले. विना किडनी व्यक्ती जिवंत राहू शकत नाही परंतु मुझफ्फरपूरच्या श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज अँन्ड हॉस्पिटलमध्ये सुनीता बेडवर पडूनच आहे. दर दोन दिवशी तिच्या शरीराचं डायलिसीस होते. कारण डायलिसीसशिवाय २ दिवसाहून जास्त काळ जिवंत राहणे कठीण आहे.