नवी मुंबई : विदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन २०० हुन अधिकांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. प्रत्येकाकडून ८० हजार ते १ लाख रुपये घेऊन तुर्की व इतर देशात नोकरीची हमी देण्यात आली होती. त्यांना विमानाचे तिकीट दिल्यानंतर प्रवासाच्या दोन दिवस अगोदर सर्वांचे तिकीट देखील रद्द करण्यात आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला.
वाशी येथील हावरे फॅंटसीया मॉलमध्ये कार्यालय थाटून हा प्रकार करण्यात आला आहे. त्याठिकाणी प्राईम इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे कार्यालय थाटण्यात आले होते. त्याची जाहिरातबाजी करून विदेशात नोकरीला लावण्याची हमी देण्यात आली होती. त्यानुसार जाहिरातबाजीला भुलून अनेकांनी कार्यालयात संपर्क साधला असता त्यांना तुर्की व इतर काही देशात नोकरीची हमी देण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येकी ८० हजार ते १ लाख रुपये आकारण्यात आले होते. त्यांनतर काही दिवसांपूर्वी त्यांना १ ऑगस्टच्या विमानाचे तिकीट देखील देण्यात आले. परंतु दोन दिवस अगोदरच सर्वांचे तिकीट रद्द झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांनी वाशी येथील कार्यालय गाठले असता कार्यालयाला त टाळे आढळून आले. यामुळे त्यांनी नावेद अली नावाच्या व्यक्तीला संपर्क साधला असता दोन दिवसात भेटीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे शुक्रवारी काहीजण पुन्हा वाशीतल्या कार्यालयात आले असता, भेट न झाल्याने व संपर्कही न झाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.