डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी 9 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोमवारी 22 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे आता संबंधित आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी 33 आरोपींना आतापर्यंत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत मात्र एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक केली, असं म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेणारे पोलीस आता या फरार आरोपीचा शोध कधी घेतात? ते पहावं लागणार आहे.
सामूहिक बलात्काराप्रकरणी आतापर्यंत आरोपींची संख्या 34 झाली आहे. याप्रकरणी 9 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायाधीश एस आर पहाडे यांच्या समोर आरोपींना हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अजूनही एक आरोपी फरार असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. हे प्रकरण गंभीर आणि घृणास्पद असल्याचं कोर्टानं देखील म्हटलं होतं. घटना घडल्यानंतर एकामागोमाग आरोपींना पकडण्याचा धडाका पोलिसांनी लावला होता.
इतकंच नाही तर याबाबत पोलीस प्रशासनाच कौतुक देखील करण्यात आलं. 22 सप्टेंबरला अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली .या गंभीर घटनेला इतके दिवस उलटूनही पोलीसांच्या हाती एक आरोपी लागत नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या आरोपीला शोधण्यासाठी तीन पथके विविध ठिकाणी रवाना झाल्याची पोलिस सूत्रांनी माहिती दिली. यासंदर्भात मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांना संपर्क साधला असता एक आरोपी फरार असून पोलिस तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.