नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात दीड कोटीचे कोकेन विकायला आलेल्या चार नायजेरियनला तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोमवारी दुपारी पकडले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ शहरात मिळाल्याने सर्वत्र खळबळ माजली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरात नायजेरियन कोकेन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांना मिळाली होती. माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत अवघडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सोलनकर, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, सहाय्यक फौजदार बाळू बांदल, शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, आनंद मोरे, शेखर पवार, सुखराम गडाख यांच्या दोन टीम बनवून प्रगतीनगर परिसरात सकाळपासून सापळा रचला होता. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर पोलीस नजर ठेवून असताना दुपारच्या सुमारास सद्गुरू अपार्टमेंटजवळ चार नायजेरियन संशयास्पद फिरताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी चारही नायजेरियन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दीड कोटींचे साडेसातशे ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. आगू ओसीता (२८), उर्जी फिलिप्स (३०), ओगोना चुकवेनेने (२९) आणि ख्रिस अजाह चुकवेनेका (३०) अशी या नायजेरियन आरोपींची नावे आहेत.
नालासोपाऱ्यात दीड कोटीचे कोकेन पकडले, चार नायजेरियन ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 1:22 AM