पुणे : समृद्ध जीवन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या महेश मोतेवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दान केलेले सोन्याचे दीड किलोचे दागिने गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ताब्यात घेतले आहेत. महेश मोतेवारने सन २०१३ मध्ये दगडूशेठ गणपतीला सोन्याचा हार, त्रिशुळ, परशू असे ६० लाख ५० हजार रुपयांचे दीड किलोचे दागिने अर्पण केले होते. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. मोतेवारने ठेवीदारांच्या पैशातून ‘दानधर्म’ केल्याचे सीआयडीच्या तपासात समोर आले होते.समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को-ॲापरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने देशभरातील लाखो गुंतवणूकदारांना २ हजार ५१२ कोटींचा गंडा घातला आहे. या प्रकरणी मोतेवारची २०७ कोटींच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. या प्रकरणात मोतेवारला सन २०१५ मध्ये अटक करण्यात आली आहे. ‘दगडूशेठ न्यासा’च्या विश्वस्तांनी संपूर्ण सहकार्य करुन हे दागिने सीआयडीकडे सुपूर्द केले. ‘दगडूशेठ न्यासा’चे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, गोरगरिबांचा तळतळाट घेऊन अर्पण केलेले दागिने बाप्पाही स्वीकारणार नाही, अशी आमची भावना आहे.
‘दगडुशेठ’ला दान दिलेले दीड किलो सोने जप्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 7:13 AM