सातारा : अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी संशयित आरोपीच्या नातेवाईकांकडून दीड लाखांची रोकड खंडणी म्हणून स्वीकारताना पोलिसांनी पीडित महिलेसह तिच्या पतीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवार, दि. १५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास नगर वाचनालयाजवळ करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेने दोन दिवसांपूर्वी सैन्य दलातील जवान संतोष जीमन (रा. कारी, ता. सातारा) याच्यावर अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर संबंधित पीडित तक्रारदार महिला तपासाला सहकार्य करत नव्हती. तसेच, दिशाभूल करणारी माहिती देत होती. जीमनवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी पीडित महिलेने जीमनच्या नातेवाईकांकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती.
दरम्यान, गुन्हा दाखल केल्यानंतर पीडित महिलेने जीमनचे नातेवाईक संतोष किर्दत यांच्याशी संपर्क साधला. गुन्हा मागे घ्यायचा असेल तर पहिला हप्ता दीड लाख आणि गुन्हा माघारी घेतल्यानंतर ५० हजार अशी दोन लाखांची मागणी केली. त्यामुळे संतोष किर्दत यांनी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. पोलिसांनी फोनवरील संभाषण ऐकल्यानंतर यातील वस्तूस्थिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी दुपारी राजवाडा येथील नगर वाचनालयाच्या शेजारी सापळा लावला. यावेळी फोटोग्राफर, दोन पंच पोलिसांनी सोबत घेतले होते.
संबंधित पीडित महिला त्या ठिकाणी आल्यानंतर तिने संतोष किर्दत यांना कस्तुरबा गांधी दवाखान्याजवळील असलेल्या बोळात नेले. काही वेळ बोलून झाल्यावर ठरल्याप्रमाणे दीड लाखांची रोकड तिने स्वीकारली. याचवेळी पोलिसांनी संबंधित पीडित महिलेला रंगेहाथ पकडले. तिच्याकडून दीड लाख रुपयांची रक्कमही पोलिसांनी साक्षीदारांसमवेत हस्तगत केली. त्यानंतर तिच्या पतीला पोलिसांनी दुस-या दिवशी रविवारी सकाळी अटक केली. या दाम्पत्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, हवालदार अतिश घाडगे, अतुला तावरे, श्रीनिवास देशमुख, हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, ओंकार यादव, मोहन पवार, सतीश बाबर आदींनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.