पुणे : गौरी गणपतीच्या दिवसात शेजारी, पाजार्यांनी आरतीला बोलावले तर अनेक जण जात असतात. शेजारीच तर जायचे असे म्हणून नुसते दार ढकलून लोक जातात. याच संधीचा गैरफायदा घेऊन चोरटे घरातील दागिन्यांवर डल्ला मारण्याची शक्यता आहे. नव्हे असा प्रकार लोहगावमधील डिफेन्स कॉलनीत घडला आहे. दार ढकलून एक महिला घरमालकांच्या घरी आरतीला गेली असताना चोरट्याने त्यांच्या घरातील १ लाख ४२ हजार ५५० रुपयांचे दागिने चोरुन नेले.याप्रकरणी निरगुडी रोडवरील डिफेन्स कॉलनीतील २१ वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्या राहत असलेल्या घरमालकांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना शनिवारी करण्यात आली. त्यावेळी त्यांना आरतीला बोलविले होते. त्या घराचे दार ढकलून पतीसह घरमालकाकडे आरतीला गेल्या. त्यानंतर गल्लीत राहणार्या आणखी एका घरी गेले. या दरम्यान चोरट्याने मुख्य दरवाजावाटे घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटातील ड्रॉव्हरवर ठेवलेली ड्रॉव्हरची चावी घेऊन ड्रॉव्हर उघडले. त्यातील १ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे दागिने असलेली पर्स चोरुन नेली. घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
अनेक घरात गौरी गणपती बसविले जातात. गौरीपूजनाला महिलांना हळदीकुंकवासाठी बोलविण्यात येते. अनेक ठिकाणी गौरी घरात आल्या असताना दरवाजा लावू नये, अशी प्रथा पाळली जाते. दरवाजा लोटून महिला शेजारी पाजारी हळदी कुंकवाला जातात. त्यातून चोरट्यांचे फावते. तेव्हा बाहेर जाताना एक तर घरात कोणीतरी असेल याची काळजी घ्यावी अथवा दोन मिनिटे जरी जायचे असेल तरी कुलूप लावूनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे.