चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील जगन्नाथबाबा मठात बापूराव संभा खारकर ( ७७) व मधुकर लटारी खुजे (६०, दोघेही रा. मांगली) या दोन शेतकऱ्यांची वजनदार वस्तूने डोक्यावर प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची घटना 23 मार्च रोजी घडली होती. दीड महिन्यानंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून एकाला अटक केली केल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकातून कळवले आहे. मात्र अटकेतील आरोपीची ओळख अद्यापही पोलिसांनी स्पष्ट केली नाही. अटकेतील आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बापूराव खारकर व मधुकर खुजे या दोघाची शेती जगनाथ बाबा मठालगत आहे. परिसरात वाघाची दहशत असल्याने हे दोघेही जगनाथ बाबा मठात झोपले होते. 22 मार्चला सकाळी या दोघांचा मृतदेहच आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. मागील दीड महिन्यापासून पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतु कोणताही सुगावा लागत नव्हता. शेवटी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात शनिवारी एका आरोपीला अटक केली. तर फरार आरोपीचा शोध सुरु आहे. अटकेतील आरोपी सहकार्यासह मंदिरात चोरी करण्यासाठी गेला असता दरवाजा उघडताना दोघेही शेतकरी जागे झाले चोरीत अडथडा येईल म्हणून त्यांनी त्या दोघांची हत्या केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह, परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, भद्रावतीचे पोनि विपीन इंगळे, सपोनि जितेंद्र बोबडे, सुधीर वर्मा, अजित देवरे, विशाल मुळे, पोउपनि विनोद भुरले, अतुल कावळे आदींनी केली.