मुंबई : वांद्रे पश्चिमच्या पाली हिल येथील १४५ वांद्रे कॅफे आणि बारमध्ये शनिवारी बंगळुरूच्या ३० वर्षीय महिला डिजिटल चित्रकाराचा विनयभंग करण्यात आला होता. याप्रकरणी तपास करणाऱ्या वांद्रे पोलिसांनी सांताक्रुझ पोलिस पथकाच्या मदतीने अवघ्या ४८ तासात श्रेय जैन (२३) याला जयपूरमधून अटक केली.
जैन विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वांद्रेतील १४५ कॅफे अँड बार येथील तांत्रिक तपासावरून आरोपीची ओळख पटली आणि तो राजस्थानच्या जयपूरचा राहणारा असल्याचे तपास अधिकाऱ्यांना समजले. त्यानुसार सांताक्रुझ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार सावंत व पथक यांनी खबऱ्याच्या आधारे जैनला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत वांद्रे पोलिस ठाण्यात आणले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली.
वांद्रे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे, निरीक्षक प्रदीप केरकर (गुन्हे), सहायक पोलिस निरीक्षक बजरंग जगताप, विजय आचरेकर आणि सांताक्रुझ पथकाने गुन्हा दाखल झाल्याच्या ४८ तासात आरोपीचा गाशा गुंडाळला. पीडित महिला मित्राच्या साखरपुड्यासाठी कुटुंबासोबत मुंबईला आली होती. त्यानंतर शनिवारी ते सर्व १४५ कॅफे अँड बारमध्ये जाऊन नाचत असताना अनोळखी मुलगा पीडितेच्या अंगचटीला जाऊ लागला. तसेच गर्दीचा फायदा घेत त्याने तिच्या अंगालाही स्पर्श केला. तेव्हा तिने त्याचा हात पकडत त्याला चापट मारत दूर लोटले. सोशल मीडियावर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तिने मुंबई पोलिसांना टॅग केले होते.
...म्हणे शुद्धीवर नव्हतोमालाडच्या आयटी कंपनीमध्ये जैन काम करत असून त्याचे कुटुंब हे जयपूरमध्ये राहते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मी त्या दिवशी भरपूर मद्य प्राशन केल्याने शुद्धीवर नव्हतो आणि त्यादरम्यान माझ्याकडून हा गुन्हा घडला असे त्याने सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.