पुणे - आई समवेत झोपलेल्या अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिचे चावे घेऊन तिचा खुन करणा-यास बंडगार्डन पोलिसांना २४ तासात अटक करण्यात यश आले आहे. मुलीचे वडिल आणि मामा यांनी दहीहंडीच्या दिवशी केलेल्या मारहाणीच्या रागातून त्याने हे विकृत्य कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रथमेश बाळू गायकवाड (वय १९, रा़ फिरस्ता, मुळ रा़ जेजुरी) असे त्याचे नाव आहे. या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. प्रथमेश याने तिचे डोके रेल्वे डब्याच्या शटरला आपटल्याने डोक्याला मोठी जखम होऊन त्यात तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.याबाबतची माहिती अशी, प्रथमेश गायकवाड हा मुळचा जेजुरीचा राहणारा असून गेल्या काही वर्षांपासून पुण्यात मिळेल ते काम करुन पुणे स्टेशन परिसरातच रहात होता. या मुलीच्या आईचा दुसरा पती व त्यांच्या शेजारीच राहणारा व मानलेला भाऊ या दोघांनी दहीहंडीच्या दिवशी प्रथमेश गायकवाड बरोबर झालेल्या वादात त्याला मारहाण केली होती. त्याचा राग त्याच्या मनात होता. त्यातून त्याने मंगळवारी सकाळी पावणेसहा वाजता आई समवेत झोपलेल्या या अडीच वर्षाच्या मुलीला पळवून नेले. त्यानंतर त्याला पुणे स्टेशन येथील पुणे -सातारा या लोकलचा रेक उभा होता. त्या ठिकाणी नेले. वाटेत त्याने तिचे चावे घेतले. डब्यात शिरताना त्याने तिचे डोके डब्याच्याशटरला डोके आपटले. डब्यातच तिला टाकून तो तेथून पळून गेला होता. रेल्वेच्या सफाई कर्मचा-यांना सकाळी ७ वाजता ही मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना सायंकाळी तिचा मृत्यु झाला.याची माहिती मिळाल्यावर शहर पोलीस दल मंगळवारी रात्री खडबडून जागे झाले.अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त रवींद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरील सर्व स्थिर व झुम अशा ६४ कॅमे-यांची तपासणी केली. त्यात एका ठिकाणी एक अंधुक व्यक्तीची आकृती दिसून आली़. त्याचा मागोवा घेत पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व सीसीटीव्हींची तपासणी केली. त्यात प्रथमेश गायकवाड हा आढळून आला. त्यावर सर्व पोलिसांनी लक्ष्य केंद्रीत करुन बुधवारी दुपारी त्याला स्टेशन परिसरातच ताब्यात घेण्यात आले.त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याचे सांगून आपल्याला मारहाण केल्याने त्या रागातून हे कृत्य केल्याचे त्याने कबुली दिल्याचेपोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले. प्रथमच न्यायवैद्यक दंत्त तपासणी पुरावा हस्तगत या गुन्ह्यात आरोपीने या मुलीला मोठ्या प्रमाणावर तीक्ष्ण चावे घेतले होते. ते चावे आरोपीनेच घेतले आहे याचा आवश्यक पुरावा प्राप्त करण्यासाठी मुंबईतील के ई एम हॉस्पिटलचे फॉरेन्सिक मेडिसिनचे प्रमुख डॉ. हरीश पाठक यांना पोलिसांनी विनंती केली़ त्यानुसार न्यायवैद्यक दंत्तशास्त्र तंज्ञ डॉ़ हेमलता पांडेय व त्यांचे सहकारी तातडीने पुण्यात आले. त्यांनी आवश्यक नमुने घेतले.
अडीच वर्षाच्या मुलीला पळवून नेऊन हत्या करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:24 PM