मीरारोड - बँकेत पाळत ठेऊन एका ज्येष्ठ नागरिकाजवळील ४० तोळे सोन्याचे दागिने लुटून पळालेल्या टोळीतील एका आरोपीस अटक करण्यात पोलीसांना यश आले असून त्याच्याकडील २० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.गणपतीनिमित्त काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील सिल्वर पार्कमध्ये राहणारे हरिश्चंद्र कुबेर हे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरीक घरी गणपती असल्याने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले ४० तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन घरी चालले होते. रस्त्यावरुन ते जात असताना मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कुबेर यांच्या हातातील दागिन्यांची पिशवी बळजबरी खेचुन लुटून नेली. या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी या आरोपींचा तपास स्थानिक गुन्हे शाखेस करण्यास सांगितला होता. गुन्हे शाखेचे निरीक्षक व्यंकट आंधळे, सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख व काशिमीरा युनिटने घटने नंतरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचे छायाचित्र मिळवले. त्याआधारे तपास करत असताना आंध प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील महेश मोशा पेटला (वय २९) याला अटक करण्यात आली. त्याने चॅन्टी उर्फ शिरीषकुमार पेटला, मल्ली पेटला व बाबु आवला यांच्यासोबत मिळुन कुबेर यांना लुटल्याचे कबुल केले. महेशकडून २० तोळे दागिने सापडले असून अन्य दागिने व टोळीतील उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरु आहे.