बुलडाणा: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावर जळगाव जामोद बसस्थानकावर सापळा रचून तीन गावठी पिस्तुल, १२ जिवंत काडतूसांसह मध्यप्रदेशातील एकास अटक केली आहे. ६ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान गेल्या दोन महिन्यात पोलिसांनी जवळपास ११ पिस्तूल जप्त केले आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहूलसिंग अजितसिंग पटवा असे असून तो मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर जिल्ह्यातील खगनार तालुक्यात येत असलेल्या पचौरी येथील रहिवाशी आहे. त्याच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये तीन पिस्तूल, सहा मॅगझीन आणि १२ जिवंत काडतुसांचा समावेश आहे. आरोपी हा स्वत:च्या घरी गावठी पिस्तूल बनवून त्यांची विक्री करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान त्यास जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास जळगाव जामोद पोलिस करत आहेत.
गेल्या दोन महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात ११ पिस्तूल, आठ दलवारी आणि २७ पेक्षा अधिक जिवंत काडतूस पोलिसांनी कारवाईमध्ये जप्त केले आहे. जळगाव जामोद, मोताळा, नांदुरा या पट्ट्यातच प्रामुख्याने या सर्व कारवाया पोलिसांनी केल्या आहेत.साखरखेर्डा येथे एटीएसच्या पथकाने कारवाई करून एकास पिस्तुलासह ताब्यात घेतले होते. त्यानंतर जिल्ह्यात या विषयाला धरून पोलिसांनी सातत्याने मोठ्या कारवाया करीत अग्नीशस्त्रे जप्त केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने मध्यप्रदेशातील पचौरी भागातूनच देशी कट्टे विक्रीसाठी आणल्या जात असल्याचा जुना इतिहास आहे.