एक तरुणी ऑनलाईन फसवणुकीला बळी ठरली आहे. अवघ्या काही मिनिटांत 30 लाख रुपये गमावले. एका झटक्यात तिची वर्षभराची मेहनत वाया गेल्याचं तरुणीचं म्हणणं आहे. ती पूर्णपणे कंगाल झाली आहे. ऑरोरा कॅसिली असं या तरुणीचं नाव असून ती ऑस्ट्रेलियातील अल्बानी येथील रहिवासी आहे. तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला. कॅसिलीला वाटले की तो मेसेज बँकेतून पाठवला असावा.
मेसेजमध्ये कोणीतरी तिच्या NAB (नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक) बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं लिहिलं होतं. माहितीसाठी 1800 क्रमांकावर कॉल करा. घाबरून कॅसिलीने त्या नंबरवर कॉल केला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीला ऐकून कॅसिलीला त्याच्यावर अजिबात संशय आला नाही. त्या व्यक्तीने कॅसिलीला सांगितले की, आर्थिक सुरक्षेसाठी तिला त्याच बँकेतील दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करावे लागतील.
कॅसिलीने तेच केले आणि बँकेचे तपशील दिले. जेणेकरून खात्यात जमा झालेले 30 लाख रुपये तो त्याच्या दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकेल. पैसे ट्रान्सफर झाल्याची पुष्टी केल्यानंतर काही सेकंदांनंतर त्या व्यक्तीने कॉल डिस्कनेक्ट केला. पण तेव्हाच कॅसिलीला कळले की तिने ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते ते NAB ऐवजी कॉमनवेल्थ बँकेचे खाते होते. काहीतरी चुकतंय असं तिला वाटायला लागलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कॅसिली सायबर क्राईमची शिकार झाली होती
news.com.au नुसार, कॅसिलीने कॉमनवेल्थ बँकेशी संपर्क साधला, परंतु त्या खात्यातून पैसे आधीच काढले गेले होते. तूर्तास, कॅसिलीने आपल्या बँकेकडे मदतीचे आवाहन केले आहे. मात्र तिचे पैसे परत मिळालेले नाहीत. कॅसिलीने सामान्य व्यवहार केला होता, ही तिचीच चूक होती, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचवेळी बँकेने अधिक सुरक्षा ठेवायला हवी होती, असे कॅसिलीचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.