ठाणे : जादा परताव्याचे आमिष दाखवून ८८ गुंतवणूकदारांची एक कोटी ३० लाखांची फसवणूक करणाऱ्या रविराज समानी याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने मेंगलोर (कर्नाटक) येथून रविवारी अटक केली. सुमारे वर्षभरापासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. त्याला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील कोलशेत येथे रविराज वास्तव्याला होता. त्याने २००७ मध्ये कापूरबावडी येथील रेवाळे तलाव परिसरात समानी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नावाने पतपेढीची निर्मिती केली होती. या पतपेढीच्या माध्यमातून त्याने गुंतवणूकदारांना वार्षिक १४ टक्के परतावा मिळेल, अशी योजना तयार केली होती. त्यामुळे ठाणे आणि भिवंडी शहरातील अनेकांनी या योजनेत गुंतवणूक केली होती. सुरुवातीची काही वर्षे त्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावाही दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण झाला. यातूनच त्यांची संख्याही वाढली. अनेकांनी लाखो रुपये या योजनेत गुंतविले. २०१८ मध्ये गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडून परताव्याची मागणी केली. मात्र, रविराजने त्यांना टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१९ मध्ये तो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन तो पसार झाला. १४ जानेवारी २०२० मध्ये काही गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.
दरम्यान, रविराज हा कर्नाटकातील मेंगलोरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्या पथकाने समानी याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने १३ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. त्याला १४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. चौकशीमध्ये त्याने या फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली दिली. आतापर्यंत ८८ गुंतवणूकदारांनी तक्रार दिली असून फसवणुकीची रक्कम एक कोटी ३० लाख १५ हजार ६२२ रुपयांच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.