मुंबई: लाच मागायचे, स्वीकारण्याचेही एकेक प्रकार असतात. कोणी थेट मागणी करतात, तर कोणी आडूनआडून सुचवतात. मात्र, वस्तू व सेवा कर विभागात (जीएसटी) उच्चपदावर असलेल्या अधिकाऱ्याने थेट कॅलक्युलेटरवर लाचेचा व्यवहार ठरविण्याचा नवा ‘परिपाठ’ सादर केला आहे.
एका व्यापाऱ्याला त्याच्या एका प्रकरणाची छाननी न करण्यासाठी आणि त्या प्रकरणात त्रास न देण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागण्यात आली. तक्रारदार व्यापारी आणि जीएसटी अधिकारी यांच्यात झालेला संवाद पुढीलप्रमाणे...
राहुलकुमार (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, जीएसटी) : झाले का बोलणे ?तक्रारदार व्यापारी : बोलणे झाले आहे. मेसेजही पाठवला आहे.राहुलकुमार : बसा. बसून बोलू.तक्रारदार व्यापारी : मी सांगितले तर आहे दोन कोटी रुपयांबद्दल.राहुलकुमार (एक मोठा पॉझ) : अशा गोष्टी कधी बोलायच्या नसतात.
असे सांगत राहुलकुमार याने या प्रकरणी तक्रारदार व्यापाऱ्यासमोर कॅलक्युलेटर ठेवला आणि दोन कोटींचा आकडा कॅलक्युलेटरच झालेल्या घासाघिशीनंतर एक कोटीवर आला. लाचेची ही रक्कम २५ लाख रुपयांच्या चार टप्प्यांत द्यायची ठरली. या लाचव्यवहारात राहुलकुमारचा भागीदार होता त्याचा बॉस आणि पुण्यात जीएसटी विभागात कार्यरत असलेला उपसंचालक विमलेशकुमार सिंह (आयआरएस अधिकारी - २०१४ बॅच).
सीबीआयची शक्कल एक कोटी लाचेची रक्कम ऐकून डोळे पांढरे झालेल्या व्यापाऱ्याने सीबीआयकडे लेखी तक्रार दाखल केली. पुरावा गोळा करण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याच्या हाताला दंडाच्या मागील बाजूस छोटा डिजिटल रेकॉर्डर बसवला. पुन्हा त्या अधिकाऱ्यांकडे व्यापाऱ्याला पाठविले. त्यामुळे सीबीआयला पुरावा मिळाला.
बोटीम ॲप राहुलकुमारने तक्रारदाराला सांगितले की, सर्वप्रथम तू दुसरा मोबाइल आणि नवीन सिम कार्ड घे. त्यावर बोटीम नावाचे ॲप डाऊनलोड कर आणि मग या अधिकाऱ्याने स्वतःचा दुसरा क्रमांक त्याला दिला. यावरून आपले पुढील बोलणे होईल, अशी सूचना दिली.
चार ठिकाणी धाडी पडताळणी केल्यानंतर गुरुवारी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी विमलेशकुमार सिंह यांच्याशी संबंधित तीन ठिकाणी मुंबईत, तर पुण्यात एके ठिकाणी छापे टाकले. या अधिकाऱ्याच्या मुंबईतील घरातून चार लाखांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.