लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतवारीतील कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने मुंबईच्या व्यापाऱ्याला फसविल्याप्रकरणी त्याच्या चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीत संतोषसोबत किरण पांडुरंग माने (४७) रा. खारघर मुंबई, जगन जगदाने, घाटकोपर, कृष्णा थोटांगे ऊर्फ विमल, अमरावती आणि इतर एकाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेकर टोळीने राज्यातील शहरांसह मुंबई, गुजरात, दिल्ली आदी मोठ्या शहरात मोठ्या व्यापाऱ्यांन जमीन स्वस्तात मिळवून देण्याचे, कमी किमतीत सोने देण्याची बतावणी करून मोठे जाळे तयार केले आहे. त्याच्या टोळीतील ब्रोकर व्यापाऱ्यांशी ओळख वाढवून त्यांना फसवितात. त्यानंतर आंबेकरशी संपर्क साधून मोठी रक्कम मिळवितात. याच पद्धतीने जून २०१९ मध्ये पटेल, माने, जगन आणि कृष्णा यांनी फिर्यादी व्यापारी शामराव मानकुमरे यांना जाळ््यात ओढले. आंबेकरने त्यांना इतवारी सराफा बाजाराशी निगडीत असल्याचे सांगून दीड कोटीचे सोने एक कोटीत देण्याची बतावणी केली. पैसे घेतल्यानंतर खूप दिवसानंतरही आंबेकरने सोने न दिल्यामुळे व्यापारी मानकुमरे यांनी पैशासाठी तगादा लावला. त्यावर आंबेकर आणि त्याच्या टोळीतील सदस्यांनी व्यापाऱ्याला अपघात घडवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यासोबतच जीव वाचविण्यासाठी २५ लाखाचा हप्ता मागितला. आंबेकरने फसविलेले अनेक व्यापारी पोलिसांकडे येत आहेत. यामुळे आंबेकरच्या फसवणुकीत टोळीतील साथीदार पुढे येत आहेत.