भिवंडी - गुजरात राज्यातील पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी आलेल्या गुजरात पोलीस व भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीची इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या खिडकीतून खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शहरातील निजामपुरा कसाई वाडा परिसरात शुक्रवारी दुपारी घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी सदर व्यक्तीच्या चौथ्या मजल्याच्या खिडकीतून ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला असल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
जमील कुरेशी ( वय ३८ , रा. कसाई वाडा ) असे चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जमील याच्यावर गुजरात येथील वापी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यात अटक करण्यासाठी शुक्रवारी गुजरात पोलीस व भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस जमील यास अटक करण्यासाठी गेले असता जमिलचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे पोलिसांनी जमील यास मारहाण केली व चौथ्या मजल्याच्या खडकीतून खाली फेकून दिल्याचा आरोप जमील याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र घटनास्थळी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी धाव घेत तणाव शांत केला असून मृतदेह शवविच्छदनासाठी स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलीस घरात घुसल्यानंतर माझ्या पतीस मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनीच माझ्या पतीला खिडकीतून बाहेर फेकून दिले त्यात त्यांचा मृत्यू झाला अशी प्रतिक्रिया जमील कुरेशी यांच्या पत्नीने केला आहे. तर मयत जमील कुरेशी यास गुजरात पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस गेले असता जमील चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल व यात कुणी दोषी आढळल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.