मुंबई: कांदिवली पश्चिम परिसरात अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत विजयकुमार गौतम (४५ ) या उत्तरप्रदेशच्या रहिवाशाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर नुसार १९ फेब्रुवारी रोजी अनोळखी व्यक्ती शताब्दी रुग्णालय परिसरात बेशुद्ध अवस्थेत पडलेली सापडली. जिला काही स्थानिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी रूग्णालयात धाव घेत त्या रुग्णाचा जबाब नोंद करण्याचा प्रयत्न केला असता, तो त्या स्थितीत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. पोलिसांनी १९ फेब्रुवारी रोजी जेव्हा रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले तेव्हा तीन अनोळखी इसम आणि एक महिला हे सदर व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन येताना दिसले. त्याच्याकडे सापडलेल्या आधार कार्डावरून त्याची ओळख विजयकुमार गौतम अशी पटली.
तसेच त्याने १६ फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया ड्रगज हाऊसमधून काही औषधे खरेदी केल्याचेही पोलिसांना समजले. आधारकार्डवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता तो बंद आढळला. दरम्यान पोलीस आता त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत असून फोनचे सीडीआर देखील मागवण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अज्ञात वाहन चालकाने गौतमला धडक देत कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता तसेच पोलिसांना देखील याची माहिती न देता पळ काढल्याचे या प्रकरणावरून उघड झाले असून त्याचा शोध सुरू आहे.