देहूगाव- अर्धा तोळा सोन्यासाठी देहूगाव येथे इंद्रायणी नदीत एक जण तरूण बुडाला व दोन जणांचे जीव वाचविण्यात यश मात्र, या दोघांना वाचविणारा अज्ञान वयस्कर देवमाणूस जीव वाचवून गेला निघून गेला. ही घटना रविवार दि. 12 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. आज सोमवार दि.13 पीएमआरडी, लोणावळा येथील शिवदुर्ग जीवरक्षक टीम व गजराज बोटींग क्लबचे कर्मचारी मृतदेहाचा शोध घेत आहेत.
विष्णू सर्जेराव पाटील वय 35 रा. सद्गुरू सोसायटी, विठ्ठलनगर या तरूणाचा बुडूण मृत्यू झाला आहे. घटना स्थळावरून पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णू पाटील व त्याच्या कुटुंबियांसमवेत रविवारी सकाळी हरतालीका पूजेचे साहित्यात इंद्रायणी नदीवर पाण्यात सोडण्यासाठी गेले होते. त्या पूजेच्या साहित्यात हरताळीकेला दागिणे म्हणून घातलेले अर्धा तोळा सोने तसेच कचरा समजून देहूगाव येथील इंद्रायणी नदीत टाकला गेल्याचे रात्री उशीरा लक्षात आले. त्यामुळे त्या अर्धा तोळा असलेली कचरा पिशवी शोधण्यासाठी विष्णू पाटील, त्यांचा भाऊ शंकर विष्णू पाटील व शेजारी राहूल सताप्पा पाटील हे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या घाटावर गेले. त्यांनी टाकलेली पिशवी नदीच्या पात्रात टाकलेली आढळून आल्याने ती काढण्यासाठी ते पाण्यात उतरले. ज्या ठिकाणी ते उतरले होते तेथे पाणी प्रवाही आहे. त्यामुळे त्यांचा पाय घसरून ते प्रवाहा बरोबर वाहू लागले. त्यांना पोहता येत असले तरी काही अंतर गेल्यावर त्यांना दम लागला म्हणून त्यांना वाचविण्यासाठी भाऊ शंकर याला हाक मारली. भाऊ बुडत असल्याचे पाहून शंकर पाटील हे देखील पाण्यात पोहत त्याच्या जवळ गेले व त्याला बाहेर काढू लागले. मात्र त्यालाही दम लागला व ते दोघेही बुडू लागले. त्यामुळे त्यांनी काठावर असलेल्या राहुल पाटील यांना हाक मारली. त्यांची हाक ऐकुण राहुल पाटील ही पोहत त्यांच्या जवळ गेले मात्र पाणी जास्त प्रवाही असल्याने बाहेर येत असताना त्यांना ही दम लागला व ते सर्व जण बुडू लागले. हे सर्व काठावर बसलेले एक अज्ञात वयस्कर इसम पाहत होते. त्यानी तीघे बुडत आहे असे पाहून त्यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली व त्यांच्या पैकी शंकर पाटील व राहुल पाटील यांना वाटविण्यात यश मिळाले. तो पर्यंत विष्णू पाटील दमल्याने पाण्य़ात वहात दूर वर गेले. त्यामुळे त्या अज्ञात वयस्कर इसम देवमाणूसाला विष्णू यांना वाचविण्यात यश आले नाही. सदर देवमाणूस वयस्कर व्यक्ती त्या दोघांना वाचविल्यानंतर तेथून निघून गेला त्यामुळे वाचविण्याऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. तर वाचलेले शंकर व राहुल त्यांना काही विचारण्याच्या मनस्थितीत नव्हते.
ही घटना घडल्यानंतर येथील गजराज बोटिंग क्लबचे कर्मचाऱ्यांनी बोटच्या सहाय्याने व गळाच्या मदतीने विष्णू यांचा शोध घेण्याचा रात्री उशीरा पर्यंत प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. सोमवार दि. 13 रोजी सकाळी ही घटना समजताच देहूरोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शाहिद पठाण, पोलीस उपनिरिक्षक प्रशांत थिटे, पोलीस नाईक प्रकाश कटके, अशोक बांगर, सुनिल यादव, तलाठी अतुल गीते, पोलीस पाटील चंद्रसेन टिळेकर आदी घटनास्थळी दाखल झाले. पीएमआरडी, लोणावळा येथील शिवदुर्ग जीवरक्षक टीम व गजराज बोटींग क्लब यांच्या सहाय्याने मृतदेह शोध कार्य सुरू केले आहे. अद्याप मृतदेह हाती लागला नसून शोध कार्य सुरू आहे.