नंदुरबार : शहरातील इंदिरा महिला सहकारी बँकेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता, धनाइदेश देवून त्याचा अनादर करणाऱ्यास न्यायालयाने वाढीव व्याजदराने कर्ज परतावा आणि तीन महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २०१६ पासून हे कर्ज त्याचे हप्ते थकवण्यात आले होते. नाजीमखाँ मुनीरखाँ मोमीन असे शिक्षा झालेल्या संशयिताचे नाव आहे.
नाजीमखाँ मोमीन याने इंदिरा महिला सहकारी बँकेमार्फत ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. दरम्यान त्याने नियमित कर्ज फेड केली नाही. बँकेने नोटीसा देवूनही थकीत कर्ज अदा केले नाही. यातून बँकेला कर्जवसुलीसाठी सप्टेंबर २०२० मध्ये दिलेला धनादेश अनादरीत झाला होता. यातून बँकेने नोटीस पाठवली होती. याप्रकरणी नंदुरबार न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती संदीप मोरे यांनी नाजीमखाँ मोमीन यास दोषी ठरवत ५८ हजार ७८६ रुपयांचा दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. बँकेतर्फे ॲड. अनिल लोढा यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. संजय पाटील यांनी सहकार्य केले.