जळगाव : लग्नास नकार दिला म्हणून नंदूरबार येथून जळगावात आलेल्या तरुणाने अल्पवयीन तरुणीला जबरदस्तीने रस्त्यात अडवून मिठीत घेतले, इतकेच नाही तर चुंबन घेऊन मित्राला मोबाईलमध्ये या प्रसंगाचे फोटो काढायला लावल्याचा प्रकार सोमवारी मेहरुणच्या उद्यानात घडला. याप्रकरणी दोघं तरुणांविरुध्द मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १७ वर्षीय मुलगी १२ वीत शिक्षण घेत आहे. नंदूरबार येथील आतेभाऊ याने वर्षभरापूर्वी मुलीकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र मुलीचे वय कमी आहे व तुम्हाला मुलगी देणार नाही असे सांगून कुटुंबाने नकार दिला होता. तेव्हापासून सागर (काल्पनीक नाव) हा जबरदस्तीने मुलीमागे लागलेला होता. तु लग्न केले नाही तर तुला पळवून घेऊन जाईल व तुझ्या भावाला उचलून नेईल अशी धमकी देत होता.
कुटुंबात हा प्रकार सांगितल्यानंतरही त्याचा पाठलाग सुरुच होता. अशातच सोमवारी दुपारी सागर हा नंदूरबार येथून एका मित्रासह जळगावात आला. मेहरुण उद्यानाकडे मुलीला अडवून काही अंतरावर घेऊन गेला व मिठीत घेत जबरदस्तीने चुंबन घेऊ लागला, त्यास मुलीने विरोध केला मात्र उपयोग झाला नाही तर दुसरा मित्र चुंबनाचे फोटो मोबाईलमध्ये काढत होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या आई, वडीलांनी तेथे धाव घेत सागरच्या तावडीतून मुलीला सोडविले. याबाबत मंगळवारी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.