भिवंडी : लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी भिवंडीतील कोनगाव येथील एका पतीने पत्नीला चक्क एक किलो सोन्याचा हार भेट म्हणून दिला. या भेटीने पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हा हार भेट देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओत पती हार भेट देताना हिंदी चित्रपटाचे गाणे गात आहे. मात्र, जेव्हा पोलिसांना हे कळाले तेव्हा त्यांनी त्या पतीराजाला बोलावले आणि याची सुरक्षा कशी ठेवणार, असे विचारले असता पतीने तो हार खोटा असल्याचे सांगताच पोलीसही चक्रावून गेले.कोनगाव येथील बाळा कोळी यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीला चक्क एक किलो वजनाचा सोन्याचा हार भेट दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोनगाव पोलिसांनी कोळी यांना पोलीस ठाण्यात बोलावून सोन्याच्या महागड्या हाराची सुरक्षा कशी कराल, एवढी महागडी वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा इतर अन्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला. त्यावेळी कोळी यांनी सांगितले की, हा हार खोटा आहे.
अशी पटली खोट्या हाराची खात्रीकोळी यांनी कल्याणच्या एका ज्वेलर्समधून एक किलो सोन्याचा हार खरेदी करून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला दिला होता. मात्र, या हाराची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी त्या ज्वेलर्समध्ये जाऊन माहिती घेतली असता ज्वेलर्स मालकाने हा हार खोटा असल्याचे सांगितले. ३८ हजारांना हार खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्यावर पोलिसांनाही हार खोटा असल्याची खात्री पटली.