नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील सिलवानीच्या खमरिया गावात रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. शनिवारी दोन समुदायांमध्ये तुफान हाणामारीची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. यामुळे मध्य प्रदेशातील वातावरण तापलं आहे. जखमींना भोपाळ येथील हमीदिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेतं. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जखमींच्या प्रकृतीची रुग्णालयात येऊन विचारपूस केली. दुसरीकडे प्रशासनाने घर आणि दुकानांवर बुलडोझर चालवून आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन समाजातील वादातून वाहने आणि घरे जाळण्यात आली असल्याची माहिती आहे. याचदरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील घटनास्थळी झाली. या घटनेत 50 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना सिलवानी आणि उदयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काहींना भोपाळ येथील हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
रायसेन जिल्ह्यातील सिलवानी तालुक्याच्या खमरिया गावात शनिवारी दोन समुदायांमध्ये हाणामारीची घटना घडली. यानंतर तणाव वाढला. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री उशिरा एका जखमीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शनिवारी कारवाई करत प्रशासनाने आरोपींची चार घरे बुलडोझरनं जमीनदोस्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घटनास्थळी जाऊन जखमींची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं की, मृत राजू आदिवासीच्या कुटुंबाला 5 लाख रुपये देण्यात येईल आणि गंभीर जखमी हरी सिंह आणि रामजीभाई यांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत दिली जाईल. इतर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने जाहीर केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.