औरंगाबाद : चार वर्षांपूर्वी शहरात गाजलेल्या डॉ. चित्रा डकरे खून प्रकरणातील आरोपी अमोल नारायण घुगे (२२) याची निर्घृण हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्याला गुन्हे शाखेने दि.२ जानेवारीला चौकशीसाठी बोलावून सोडून दिलेले होते. त्यानंतर त्यांना सिडको गुन्हे प्रकटीकरण शाखेने चौकशीकामी बोलविले. तेव्हाही ते अगदी मोकळेपणाने उत्तरे देऊन तपासाची दिशा भरकटवत होते.
गौरव वानखेडे आणि शुभम सातपुते या दोघांची पोलीस चौकशी करीत असताना मोंढ्यात गेलो, परत आलो घरी सोडले आणि आपापल्या घरी निघून गेलो, हीच बतावणी ते गेले दोन दिवस करीत होते; परंतु कॉलनीतील सीसीटीव्हीत लडखडत चालणाऱ्यांचे फुटेज मिळाले अन् पोलिसांनी वेगळी शक्कल वापरून दोघांनाही वेगवेगळे प्रश्न विचारले तेव्हा ते दोघे पोपटासारखे बोलू लागले व त्यांचे खरे बिंग फुटले. शुक्रवारी सायंकाळी अमोलचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत अयोध्यानगरातील नाल्यात मिळून आल्याने आरोपी गौरव वानखेडे आणि शुभम सातपुते या दोघांना पोलिसांपुढे कबुली देण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.
डोक्यात टाकला दगड२०१५ साली शहरात झालेल्या डॉ. चित्रा डकरे (रा. अमरावती) यांच्या खुनातील आरोपी असलेला अमोल घुगे हा ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून बेपत्ता होता. अमोलच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो मिळून न आल्याने सिडको पोलीस ठाण्यात अमोल बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार पथक परिसरातील नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेत होते. तेव्हा एका महिलेने सांगितले की, गल्लीत धडाम आवाज आल्याने तिने दार उघडून बाहेर पाहिले असता अमोल हा खाली पडलेला दिसला आणि इतर काही जण तेथून पळून गेलेले होते. तो नेहमीच दारू पिऊन गल्लीत पडलेला दिसतो. त्यामुळे महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले होते; परंतु तो बेपत्ता असल्याने ही कहाणी महिलेने पोलिसांना सांगितल्याने पोलिसांचाही संशय बळावला होता. गुन्हेगारी वृत्तीचे त्याच्यासोबतचे मित्रदेखील बेपत्ता असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत होते. सहायक फौजदार सुधाकर पाटील यांच्याकडे हरवल्याच्या तक्रारीची चौकशी असल्याने त्यांचे पथक सतत शोधात फिरत होते.
अमोलवर अनेक वार, पायांचा चुराडामारेकरी सौरभ वानखेडे, रितेश फुसे, गौरव वानखेडे, शुभम सातपुते यांनी लाकडाने पायांवर अनेक वार केल्याने त्याच्या पायांची हाडे तुटली होती, तर पोटातून कोथळा बाहेर आल्याचे तपास पथकाला आढळून आले होते. ३१ डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन अमोल घुगे याच्यासोबत भांडण झाले. त्यानंतर हा वाद विकोपाला गेल्याने मारेकऱ्यांनी त्याला ठार करून मृतदेह जाळून तो अयोध्यानगरातील नाल्यात टाकण्यात आला होता.
हे गँगवारच त्यांच्यात लोक तुला जास्त भितात की आम्हाला, यावरून दारू पिऊन सतत भांडणे होत असत. अखेर किरकोळ भांडणातून अमोलची जीवनयात्राच संपविली. स्थानिक गँगवार भडकल्याचे चित्र या घटनेवरून उफळल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
तीन दिवस पोलीस कोठडीगुन्हेगारांनी हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र जप्त करणे, तसेच दोन फरार आरोपींना अटक करणे बाकी आहे. गौरव वानखेडे, शुभम विसपुते या दोघांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे अधिक तपास करीत असून, दोन्ही फरार आरोपी लवकरच पकडले जातील, असे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले.