मुंबई :आॅनलाइन खरेदी केलेल्या हजार रुपयांच्या ड्रेससाठी गिरगावमधील निवृत्त बँक अधिकाºयाला १ लाखाचा फटका बसला आहे. याप्रकरणी व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात आॅनलाइन भामट्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गिरगाव परिसरात राहणारे मधुसुदन अमृते (६१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २०१८मध्ये ते एका नामांकित बँकेतून निवृत्त झाले. ६ जुलै रोजी त्यांच्या पत्नीने क्रेडिट कार्डने १ हजार ९९ रुपयांचा आॅनलाइन ड्रेस खरेदी केला. ९ तारखेला ड्रेसची डिलिव्हरी झाली. मात्र ड्रेस न आवडल्याने त्यांनी गुगलवरून संबंधित कंपनीचा ग्राहक सेवा क्रमांक मिळवला. संबंधित कॉलधारकाने त्यांना लिंक पाठवून त्यात क्रेडिट कार्डचा तपशील भरताच खात्यात पैसे जमा होतील असे सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून सर्व तपशील भरला. त्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक शेअर करताच त्यांच्या खात्यातून तब्बल १ लाख ७ हजार ६५ रुपये वजा झाल्याचा संदेश अमृते यांच्या मोबाइलवर धडकला. त्यांनी संबंधित क्रमांकावर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाइल बंद लागल्याने त्यांची चिंता वाढली. सलग दोन दिवस ते त्यावर कॉल करत होते. मात्र काहीच प्रतिसाद न आल्याने यात फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यांनी व्हीपी रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सतर्क राहा...लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारे फसवणुकीच्या घटना डोके वर काढत आहे. नागरिकांनी आपल्या कार्ड, बँकेविषयीची गोपनीय माहिती, ओटीपी क्रमांक कुणालाही शेअर करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकड़ून देण्यात येत आहे.
हजार रुपयांच्या ड्रेससाठी एक लाखाचा फटका, निवृत्त बँक अधिकाऱ्याची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 7:26 AM