वणी (यवतमाळ) : कापूस विक्री करून दुचाकीने परतणाऱ्या शेतकऱ्याकडून तिघांनी एक लाख १८ हजार रुपये लुटले. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजता मारेगाव तालुक्यातील सुसरी ते बंदी वाढोणा रस्त्यावर घडली.मारेगाव तालुक्यातील बंदी वाढोणा येथील संदीप वासुदेव चव्हाण (३१) हा युवक आपले शेतमालक उमेश राठोड यांचा कापूस घेऊन मारेगाव येथे गेला होता. तेथील जिनिंगमध्ये कापूस विक्री केल्यानंतर तो आपल्या दुचाकीने (एम.एच.२९/बीएन-९८५) मारेगाव येथून बंदी वाढोणाकडे जात होता. सुसरीच्यासमोर अज्ञात तिघांनी त्याची दुचाकी अडविली. संदीपने दुचाकीवरील पेट्रोलपंपाच्या कव्हरमध्ये ठेवलेले एक लाख १८ हजार ९९५ रुपये तीन युवकांनी लुटले. यानंतर घाबरलेल्या अवस्थेत गावात पोहोचलेल्या संदीपने शेतमालक उमेश राठोड यांना माहिती दिली. त्यांनी गुरुवारी मारेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून मारेगाव पोलिसांनी अज्ञात तीन आरोपींविरूद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
कापूस विक्री करून परतणाऱ्या शेतकऱ्याकडून एक लाख लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 4:23 PM