मुंबई: ईस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात बोकायदेशीर कृत्य केल्याच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) जालन्यातून आणखी एका आरोपीला अटक केली आहे. शेख उमेर शेख हबीब (३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शेखच्या अटकेने एटीएसने याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या २२ झाली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राज्य पोलिसांच्या मदतीने पीएफआय संघटनेच्या १५ राज्यांमधील एकूण ९३ ठिकाणी प्रमुख नेत्यांसह सदस्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली. या कारवाईमध्ये पीएफआयशी संबंधित एकूण १०६ जणांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. यातील ४५ जणांना एनआयएने अटक केली आहे.
एनआयएच्या सोबतीने राज्य एटीएसने दाखल केलेल्या चार गुन्ह्यांत पीएफआयशी संबंधीत मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव येथे छापेमारी करत २१ जणांना अटक केली आहे. त्यापाठोपाठ या गुन्ह्यात शेखविरोधातील पुरावे मिळाल्याने एटीएसने जालनामधून सोमवारी त्याला अटक केली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १५ ऑकटोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.