मालेगाव मध्य (नाशिक): शहरातील गवळीवाडा येथे रात्री अकराच्या सुमारास भांडण सोडविण्यासाठी आला असल्याचे क्षुल्लक कारणावरून ताहीर हुसैन अख्तर समसुजमा (४१) या शेजारीच्या छातीत चाकुने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृताची पत्नी रुखसाना निकहत ताहीर हुसैन अख्तर हिने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील कुसुंबा रस्त्यावरील गवळीवाडा येथे मयत ताहीर हुसैन अख्तर व संशयित शेख रफीक शेख इस्माईल उर्फ राजा हे शेजारी राहतात. रात्री अकराच्या सुमारास संशयित रफीक शेख हा त्याची लहान मुलगी सनास मारहाण करीत असल्याने जोरजोराने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. आवाज ऐकुन मयत ताहीर हुसैन अख्तर व पत्नी रुखसाना निकहत घराबाहेर आले. तेव्हा आपलेच भांडण सोडविण्यासाठी आले असल्याचा समज झाल्याने तु हमारे झगडे मे गिर मत तेरा देख, असे शेख रफीक म्हणाला. तुमच्या आरडाओरडमुळे शेजाऱ्यांना त्रास होतो, असे ताहीर हुसैन अख्तर समजावुन सांगत असताना त्याने मयतास शिवीगाळ करु लागला. त्यामुळे गल्लीतील दोन महिलांनीही शिवीगाळ करु नये, असे समजावुन सांगत असतांना रफीकने कमरेतुन चाकु काढुन ताहीरच्या छातीत मध्यभागी खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे ताहीर हुसैन जोरात ओरडल्याने पत्नी रुखसाना निकहत त्यांना सोडविण्यासाठी गेली असता तिला तोंडावर मारुन धक्का देवुन रफीक फरार झाला.
रक्तबंबाळ अवस्थेत उचलुन ताहीरला गल्लीतील दोन जणांनी उपचारार्थ सामान्य रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. ताहीर हुसैनवर सकाळी सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करुन दुपारी त्याचा बडा कब्रस्तानात दफनविधी करण्यात येणार असल्याची माहिती नातलगांनी दिली.पोलीस उप अधिक्षक रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख अधिक तपास करीत आहे.पोलीसांनी फरार संशयित शेख रफीक याच्या शोधार्थ विविध ठिकाणी छापेमारी केली. परंतु तो पोलीसांच्या हाती लागला नाही. हुसैन अख्तर यांच्या पश्चात वडील, पत्नी, भाऊ, चार मुली दोन मुले असा परिवार आहे.