लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मैत्रिणीच्या संपर्कातून कॉल गर्लच्या जाळ्यात अडकलेल्या एका ४१ वर्षीय कंत्राटदाराला एका रात्रीसाठी ३३ लाख ५५ हजार रुपये गमावण्याची वेळ ओढवली आहे. कॉल गर्लने पतीच्या मदतीने दोघांच्या संबंधाचे व्हिडीओ कुटुंबीयांना शेअर करण्याबरोबर बलात्काराची खोटी तक्रार करण्याची भीती घालून पैसे उकळले. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
खोपोलीचे रहिवासी असलेले ४१ वर्षीय तक्रारदार रस्ते बांधकामाचे कंत्राटदार आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये मैत्रिणीशी गप्पा सुरू असताना तिच्या फोनवरून काजल महतो नावाच्या तरुणीशी त्यांचा संपर्क झाला. त्यानंतर, काजलचे फोन सुरू झाले. काही दिवसांनी तिने आपण कॉल गर्ल म्हणून काम करत असून एका रात्रीचे २० हजार रुपये घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार, कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर त्यांची भेट झाली. तिच्यासोबत एक रात्रही तक्रारदाराने घालवली. त्यानंतर भेटीगाठी वाढल्या. दरम्यानच्या काळात काजलने तक्रारदाराच्या मोबाइलमधील सर्व संपर्क क्रमांक काढून घेतले. पुढे मधाळ जाळ्यात ओढून त्याच्याकडून टीव्ही घेतला. आणखीन मागणी वाढताच तक्रारदाराने तिला नकार दिला.
मैत्रिणीला सांगताच प्रकरण उघड...
- दोघे फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच संबंधिताने घडलेला प्रकार मैत्रिणीला सांगितला.
- तिने महतो दाम्पत्याला पैसे परत करण्याची मागणी केली. त्यांनी कॉल घेणे बंद केले. अखेर, पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
- कुर्ला पोलिसांनी दोघांविरोधात फसवणूक, खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. अधिक तपास सुरू आहे.
- नकार ऐकताच दोघांच्या संबंधाचे व्हिडीओ पत्नी व नातेवाइकांना पाठवण्याची धमकी काजलने दिली. घाबरलेल्या कंत्राटदाराने ५ ऑगस्ट रोजी तिला ७५ हजार रुपये दिले. पुढे २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर ३० लाख ५० हजार रुपये काजलने उकळले. तिने आणखी १० लाखांची मागणी केली. त्यांनी फोन घेणे बंद केले. त्यानंतर काजलचा पती हरिशंकरने कॉल करून माझ्या पत्नीवर बलात्कार केला म्हणून १० लाख रुपयेे दे, अशी धमकी दिली.