मीरारोड - मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेर हप्ता देण्यास नकार दिला म्हणून एका फेरीवाल्यास बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटने प्रकरणी नया नगर पोलिसांनी ६ दिवसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे .
मीरारोडच्या शांती नगर सेक्टर २ मध्ये राहणारे अजित लोंढे हे मीरारोड रेल्वे स्थानक लगत असलेल्या भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात . ३१ जानेवारी रोजी रात्री साडे सातच्या सुमारास लोंढे हे भाजीविक्री करत असताना बाबू बाबर व राजा मदेसिया हे आले आणि इथे असेल तर ४ हजार रुपये महिना द्यावा लागेल असे धमकावले . लोंढे यांनी हप्ता देण्यास नकार दिला असता दोघांनी त्याला मारहाण करून निघून गेले .
काहीवेळाने बाबर व राजा हे त्यांच्या सोबत अजय , रमेश , जयश्री बाबर , प्रेमा मदेसिया , पिनका निषाद , जिनका , मनुमा यांनी परत येऊन लोंढे यांना लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली . जखमी लोंढे यांच्या डोक्यावर तसेच शरीरावर मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे . त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत . या घटनेने फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली करणाऱ्या माफियांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे .