जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मनसेचे राबोडीतील प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्ये प्रकरणातील शाहिद शेख (३५, रा. राबोडी, ठाणे) या संशयितास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लोकमत ला दिली. या हत्याकांडातील आरोपींना अटक केल्याशिवाय जमील यांचा दफनविधी करणार नाही, असा पवित्रा मनसे तसेच जमील च्या कुटूबीयांनी घेतला होता.त्यामुळे या खुनातील आरोपींना पकडणे ठाणे पोलिसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
राबोडीतीतील बिस्मिल्ला हॉटेल समोरुन २४ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास जमील हे मोटार सायकलीवरून जात असताना त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला होता. त्यानंतर हल्लेखोर हे पसार झाले होते. या खुनातील आरोपी कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही. तपास नि:पक्ष पणे केला जाईल, असे आश्वासन ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी जमीलच्या नातेवाईकांना दिले होते.
त्यामुळे राबोडी पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग अशी पाच पथके या तपासासाठी नेमण्यात आली आहेत. शाहिद याचा या खुनात नेमकी कशाप्रकारे सहभाग आहे, याची चौकशी करण्यात येत असल्याची माहीती सूत्रांनी दिली.