विमाननगर : पॉंडिचेरी राज्यपाल डॉ. किरण बेदी यांचा व्हीआयपी रोडवरून ताफा जाण्यापूर्वी भर रस्त्यावर कार उभी करून वाहतूक कोंडी करणाऱ्या उद्दाम चालकाने वाहतूक पोलीस निरीक्षकालाच शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी येरवड्यात घडला.याप्रकरणी येरवडा वहातूक शाखेचे पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरवडापोलिसांनी रामदास पिलाजी शिरगावकर (वय 40,रा. कोकणीपाडा, मुंबई ) याच्या विरोधात शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. राज्यपाल डॉ. किरण बेदी या पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांच्या सरकारी वाहनांचा ताफा येरवडा गुंजन चौक येथून पुढे जाणार होता.दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गुंजन चौक ते पर्णकुटी चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. येरवडा पोलिसांनी कोंडी का झाली याची माहिती घेतली असता गाडीतळ चौकात स्विफ्ट कार क्र.(एमएच 47 के.बी.5743) रस्त्याच्या मध्येच उभी केली होती. वाहन बाजूला काढण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांसोबत चालक रामदास शिरगावकर याने हुज्जत घातली. वाद वाढू नये व वाहतूक कोंडी लवकर सोडवण्यासाठी तिथे आलेल्या पोलीस निरीक्षक रमेश साठे यांना देखील त्याने वादविवाद करून शिवीगाळ केली. याप्रकरणी शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्या उद्दाम चालकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ करणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 7:27 PM