लोणी काळभोर : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने उरुळीकांचन ( ता हवेली ) दत्तवाडी रोड येथे दोन सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तुल, जिवंत काडतूस, तलवार जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महादेव उर्फ हंटर पोपट पांगारकर ( वय २४, रा.सहजपूर, ता.दौंड जि.पुणे ) व राहूल सुरेश भिलारे ( वय २७, रा.जावजीबुवाची वाडी, ता.दौंड जि.पुणे. सध्या दोघे रा.उरुळीकांचन, इंदिरानगर ता.हवेली जि.पुणे ) यांना अटक करून पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तसेच रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपी यांना पकडणे कामी विशेष मोहिम राबविणेबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहा.पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधवर, महेश गायकवाड, निलेश कदम, विद्याधर निचित, दत्तात्रय तांबे, गुरू गायकवाड, सुभाष राऊत यांचे पथक नेमण्यात आलेले होते.
सोमवारी ( १२ ऑगस्ट ) रोजी सदर पथक लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील उरुळीकांचन परिसरात रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेत असताना सदर पथकातील महेश गायकवाड व निलेश कदम यांना उरुळीकांचन येथे महादेव पांगारकर याचे कमरेला पिस्टल व राहूल भिलारे याचेकडे तलवार असून ते दोघे काळे रंगाचे पुढे नंबर नसलेल्या पल्सर दुचाकी वरून दत्तवाडी रोड रेल्वे पुलाजवळ येणार आहे, अशी माहिती खबऱ्यांकडून मिळाल्याने पोलीस पथकाने दत्तवाडी रोड, रेल्वे पुलाजवळ सापळा रचला. या ठिकाणी पोलीस आहेत हे लक्षात येताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलीस पथकाने सतर्कतेने पांगारकर व भिलारे यांना जेरबंद केले. त्यांची अंगझडती घेतली असता पांगारकर याचे ताब्यात एक गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस ( बुलेट ) तर भिलारे याचेकडे एक स्टीलचे रंगाची लोखंडी तलवार अशी घातक शस्त्रे याचबरोबर मोबाईल मिळून आला आहे. पिस्तुल व काडतूस परवान्या बाबत चौकशी केली असता त्यांनी नसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी वापरलेली काळे रंगाची बजाज पल्सर-२२० मोटार सायकल( एमएच ४२ एजे ९२५३) यासह एकूण किंमत रुपये १ लाख २१ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आला आहे. दोघांना ताब्यात घेवून त्यांचेविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई कामी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेला आहे.