ठाणे - नामांकित कंपन्यांच्या बनावट टीव्ही संचाची हुबेहूब निर्मिती करून त्यांची विक्री करणाऱ्या अजय सिंह (४०, रा. पलावा सिटी, डोंबिवली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट-५ च्या पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्याकडून ६० टीव्ही संचांसह इतर सामग्री असा पाच लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.नामांकित ब्रॅण्डच्या नावाखाली बनावट टीव्हीची निर्मिती करून त्याची विक्री सुरूअसल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे बनावट टीव्हीची निर्मिती करून विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. अशाच एका व्यक्तीची फसवणूक झाल्याने त्याने याप्रकरणी २० मार्च रोजी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणाचा समांतर तपास वागळे इस्टेट युनिट-५ च्या पथकाकडून करण्यात येत होता. भिवंडीच्या काल्हेर येथील एका दुकानात बनवलेल्या टीव्ही संचांना नामांकित कंपन्यांचे लेबल लावून त्यांची विक्र ी करून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे आणि श्रीनिवास तुंगेनवार आणि जमादार बाबू चव्हाण आदींच्या पथकाने काल्हेर येथील एचबी इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अॅप्लायन्स या दुकानांवर २० मार्च रोजी छापा टाकला असता हा प्रकार उघडकीस आला.पोलिसांनी दुकान मालक अजय सिंह याची चौकशी केली असता, एका सॉफ्टवेअरद्वारे नामांकित टीव्ही कंपन्यांचे सिम्बॉल अपलोड करून ते दुकानात बनवलेल्या टीव्ही संचांना लावल्याचे त्याने सांगितले. हे बनावट टीव्ही संच नामंकित कंपन्यांचे असल्याचे भासवून त्यांची विक्र ी केल्याची कबुली त्याने दिली. त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांचे ६० बनावट टीव्ही संच आणि सामग्री हस्तगत केली आहे.
बनावट टीव्ही संचांची विक्री करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 4:35 AM