प्रदीप भाकरे
अमरावती: तो तिला भेटण्यासाठी, तिला इम्प्रेस करण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन अंजनगाव सुर्जीला पोहोचला. मात्र, तिने बोलण्यास नकार देऊन होमगार्डची मदतीने त्याला पकडून दिले. त्यामुळे प्रेयसीची भेट झाली की, अमरावतीला परत जाऊ इच्छिणाऱ्या त्या तरूणाला पोलीस ठाण्यातच मुक्काम करावा लागला. गुरूवारची त्याची अख्खी रात्र अंजनगाव पोलीस ठाण्यातील हवालतीत गेली.
अंजनगाव सुर्जी येथे ४ मे रोजी दुपारी १२.३० ते एकच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी आरोपी प्रियकर आकाश नारायण वानखडे (२८, रा. श्यामनगर, अमरावती) याच्याविरूध्द गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. फिर्यादी तरूणी ही अंजनगाव येथे कॉलेजमध्ये आली होती. गुरूवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ती कॉलेजमधून घरी पायी जात होती. त्यावेळी ओळखीचा असलेला आरोपी आकाश वानखडे हा चार चाकी गाडी घेऊन तिच्याजवळ आला. थांब, मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे म्हणत त्याने तिला थांबण्याबाबत बजावले. त्यावर त्याने थांब, आता आपण पोलीस स्टेशनमध्ये बोलू, असे म्हणून ती पायी सोनार गल्लीत पोहोचली. तो देखील तिच्या मागे सोनार गल्लीत पोहोचला. दोन मिनिट थांब, मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे तो म्हणाला.
होमगार्डची घेतली मदत
दरम्यान, ती पायी पुढील चौकात आली असता तेथे तिला दोन होमगार्ड दिसले. आकाश वानखडे हा आपला पाठलाग करत असल्याचे तिने त्यांना सांगितले. त्यावर ते दोन्ही होमगार्ड आरोपी आकाश वानखडे याला त्यांच्या दुचाकीवर बसवून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. लगोलग ती तरूणी देखील ठाण्यात पोहोचली. तथा तिने त्याच्याविरूध्द तक्रार नोंदविली. आरोपीला अटक करण्यात आल असून शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती अंजनगावचे ठाणेदार दीपक वानखडे यांनी दिली.वाढदिवसाला देखील तो तिच्या गावात अमरावतीचा रहिवासी आकाश वानखडे हा नेहमीच आपल्या गावात येऊन आपली माहिती घेतो. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीदेखील तो गावात आला होता. तो नेहमीच आपली माहिती घेत पाठलाग करत असतो. त्याच्या या प्रेमातिरेकामुळे आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचे त्या कॉलेजकन्येने पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.