डोंबिवली : विदर्भ एक्स्प्रेसमधून बुलडाणा जिल्ह्यातील आमदार राहुल बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स चोरणाऱ्या अहमद हबिबअली सय्यद (२८) याला मंगळवारी कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई केली असून त्याच्याकडून ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.कल्याण पूर्वेतील दत्त मंदिर झोपडपट्टीत सय्यद राहतो. त्याच्या शोधासाठी एक पथक तैनात केले होते. पोलीस निरीक्षक ए.एस. शेख याप्रकरणी तपास करत होते. मंगळवारी हे पथक त्याच्या घरी गेले. तेथे तो नाशिकला गेल्याचे समजले. तो काशी एक्स्प्रेसने कल्याण स्थानकात रात्री ८.३० वाजता येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, फलाट-५ वर सापळा रचण्यात आला. तो स्थानकात उतरताच त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी सांगितले. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर रात्री उशिराने त्याला अटक केल्याचे बारटक्के म्हणाले.कल्याण स्थानकात सकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास विदर्भ एक्स्प्रेस आली. तेव्हा बोंद्रे यांची पत्नी वृषाली यांच्याकडील पर्स आणि महत्त्वाची कागदपत्रे घेऊ न चोरट्याने धूम ठोकली होती. पर्समध्ये २४ हजारांची रोकड, मोबाइल आणि इतर साहित्य असा ५१ हजारांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी बोंद्रे यांनी सीएसटी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर, हे प्रकरण कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. पोलिसांनी ४८ तासांत चोरट्याचा शोध लावला असला, तरी सर्वसामान्य प्रवाशांबाबतही जलद तपास व्हावा, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली.
आमदार बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स लांबविणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 5:44 AM