नवी मुंबई : रेल्वे पोलिसांचे मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. नेरुळ स्थानकात एका चोरट्याला पकडल्यानंतर अधिक तपासात पोलिसांनी त्याच्या इतर तिघा साथीदारांनाही अटक केली आहे. त्यामध्ये तिघे नेरूळचे तर एकजण पनवेलचा राहणारा आहे. रेल्वे स्थानकात तसेच धावत्या रेल्वेत ते मोबाइल चोरी करायचे.
ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेत तसेच फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांचे मोबाइल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी नेरूळ स्थानकात फलाटावर फोनवर बोलत उभ्या असलेल्या फैजल शेख (२५) या प्रवाशाचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न दोघांनी केला होता. यावेळी प्रवाशांच्या मदतीने एका चोरट्याला पकडले. त्यानंतर टोळीच्या मुसक्या वाशी रेल्वे पोलिसांनी आवळल्या.
चौकशीत मिळाली साथीदारांची माहितीमोबाइल चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटारे यांनी निरीक्षक सचिन गवते, उपनिरीक्षक कृष्णा पाटोळे, दत्तात्रय बदाले, हवालदार सुनील पाटील, अनंता जावळे, कपिल देशमुख, आदींचे पथक स्थापन केले होते. त्यांनी हाती लागलेल्या करण लष्करे याच्याकडे अधिक चौकशी करून त्याच्या साथीदारांची माहिती मिळवली.त्यामध्ये योगेश अंबरे, मारुती यल्लापा पवार, मारुती साहेबराव पवार हे तिघेही हाती लागले. त्यांपैकी योगेश हा पनवेलचा राहणारा असून इतर तिघे नेरूळचे राहणारे आहेत. त्यांनी केलेले मोबाइल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये जुईनगर, सानपाडा व नेरूळ स्थानकांत घडलेले गुन्हे आहेत. अटक केलेल्या चौकडीकडून पोलिसांनी चोरीचे मोबाइल जप्त केले आहेत.