लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इलेक्ट्रिक वायर आणि केबल निर्मितीच्या व्यवहारात कार्यरत असलेल्या पॉलीकॅब कंपनीवर आयकर खात्याने २२ डिसेंबर रोजी छापेमारी केली होती. या छापेमारीदरम्यान कंपनीचे तब्बल एक हजार कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार उजेडात आल्याची माहिती आहे. याखेरीज कच्च्या मालाच्या खरेदीसाठी वितरकांनी कंपनीच्या वतीने केलेल्या ४०० कोटी रुपयांच्या व्यवहाराचाही छडा लागला असून, ती रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे.
आयकर विभागाने यासंदर्भात प्रसिद्धिपत्रक जारी करीत माहिती दिली आहे. २२ डिसेंबर रोजी कंपनीच्या मुख्य कार्यालयासह मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, दमण, हलोल व दिल्ली अशा एकूण ५० ठिकाणी आयकर अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. या छाप्यांदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण ४ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. तर कंपनीची २५ बँक लॉकर्स असल्याचेही आढळून आले असून ते सील करण्यात आले आहेत.
या छाप्यांदरम्यान काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. त्यावरून कंपनीने आपल्या उत्पादनांच्या विक्रीचे व्यवहार रोखीने केल्याचे आढळून आले. याची सखोल पडताळणी केली असता, हे व्यवहार तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे दिसून आले. आयकर विभाग यासंदर्भात अधिक चाैकशी करत असून त्यातून आणखी काही माहिती मिळू शकते.
विशेष म्हणजे, कंपनीने आपल्या उत्पादनांची केवळ विक्री रोखीने केली नाही तर कच्च्या मालाची खरेदीही रोखीने केल्याचे तपासात आढळून आले; मात्र करासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना बनावट कागदपत्रे तयार केली असल्याचा संशय आयकर अधिकाऱ्यांना आला आहे. याखेरीज कंपनीने केलेल्या उपकंत्राटापोटीचे व्यवहारही बनावट असल्याचे दिसून आले असून, ही रक्कम १०० कोटींच्या घरात आहे. त्याअनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.