कल्याण : जेवणाची आॅनलाइन आॅर्डर करणे एका ४२ वर्षीय व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. जेवणाची आॅर्डर कॅ न्सल झाल्याची बतावणी करत एका भामट्याने आॅनलाइनच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून ४९ हजार १६० रुपये परस्पर काढले.पश्चिमेतील गांधारी परिसरात राहणारे व्यापारी पंकज तिवारी (४२) यांनी एका अॅपच्या माध्यमातून १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास जेवणाची आॅर्डर दिली. त्यासाठी त्यांनी १२७ रुपये भरले. थोड्या वेळाने एका भामट्याने तिवारी यांना फोन करत त्यांचे लोकेशन टेÑस होत नसल्याने जेवणाची आॅर्डर कॅ न्सल झाल्याचे सांगितले.त्यावेळी जेवणाच्या आॅर्डरसाठी भरलेल्या पैशांची मागणी तिवारी यांनी त्याच्याकडे केली. तेव्हा, या भामट्याने त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. त्या लिंकवर पाच रुपये जीएसटी भरण्यास भामट्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिवारी यांनी त्या लिंकवर क्लिक करून पैसे भरले. त्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ४९ हजार १६० रुपये आॅनलाइनच्या माध्यमातून काढण्यात आल्याचे तिवारी यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी तिवारी यांनी मंगळवारी दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.