आॅनलाइन लोकमतधुळे : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासंदर्भात आवाज न उठविणाºया मराठा समाजाच्या १४७ आमदारांचा निषेध म्हणून त्यांची मराठा क्रांती मोर्चातर्फे शहरात सकाळी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. सकाळी ११.३० वाजता चाळीसगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या प्रतीकात्मक अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक प्रेतास भडाग्नी देत असताना जितेंद्र जांभळे (४२) याने सर्वांची नजर चुकवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढला आणि तेथून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. प्रतीकात्मक अंत्ययात्रा आग्रारोडमार्गे पाचकंदील चौक, शहर पोलीस चौकी, कराचीवाला खुंट चौक या मार्गे महापालिकेजवळ पोहचली. तेथे अंत्ययात्रेस प्रतीकात्मक विसावा देण्यात आला. तेथून अंत्ययात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी आणण्यात आली. या अंत्ययात्रेत मराठा समाजबांधवांसह राजकीय पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान अंत्ययात्रा आंदोलनस्थळी पोहचली. त्यानंतर प्रेतयात्रेला भडाग्नी देत असतानाच जितेंद्र जांभळे या व्यक्तीने सर्वांनी नजर चुकवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढला. आणि तेथून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यास वेळीच ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. प्रतीकात्मक अंत्ययात्रेस पोलीस दलातर्फे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.