बोरगाव मंजू : टाकळी पोटे येथे शेतीच्या वादावरून सोमवारी रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला होता. राग मनात धरून आरोपीने जवळा शेतशिवारात रखवालीसाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीचे वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विठ्ठल नथ्थुजी ठाकरे (रा.टाकळी पोटे) असे मृतकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल नथ्थुजी ठाकरे व योगेश जळमकर दोघेही (रा.टाकळी पोटे) या दोघांमध्ये शेतीच्या कारणावरून सोमवारी रात्रीच्या सुमारास वाद झाला होता. दरम्यान, वाद झाल्यानंतर मिटला होता. त्यानंतर, विठ्ठल ठाकरे हे नेहमीप्रमाणे जवळा शेतशिवारात असलेल्या शेतात रखवालीसाठी गेले होते. सायंकाळी वाद झाल्यानंतर आरोपी योगेश जळमकर याने मनात राग धरून रखवालीसाठी गेलेल्या विठ्ठल ठाकरे यांच्या मागावर जात झोपेत असलेल्या विठ्ठल ठाकरेवर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये विठ्ठल ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत विठ्ठल ठाकरे घरी न पोहोचल्याने नातेवाइकांनी शेतात जाऊन शोध घेतला असता तिथे विठ्ठल ठाकरे यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, ठाणेदार सुनील सोळंकेसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. गोविंद ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, योगेश जळमकर यास पोलिसांनी ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंकेसह पोलीस करीत आहेत. दरम्यान, टाकळी पोटे हे गाव पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेवराव पडघान यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.